आनंदघन आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अमरावती ( र. नं एफ २९५६२) विषयी
श्रींच्या विश्रांती स्थानाचा सूर्योदय प्रकाशमान होत असतांना जे जे डोळ्यासमोर तरळते आहे किंवा श्री सद्गुरू जशी लेखणी पुढे पुढे सरकविण्यास स्फुर्ती देत आहेत तसतसे घटनाक्रम आपल्या वाचक भक्तांच्या नजरेस पडणार आहेत.
१९८७ हे वर्ष आम्हा उभयतांच्या (ऐन तारुण्यात आम्हास लाभलेलं श्रींच्या सेवेचं प्रथम वर्ष) आयुष्यातील आध्यात्मिक वळणावरचं पहिलं पाऊल ! हे पाऊल श्रींच्या सेवेकडे वळविण्यास आमच्या आईचा शुभाशिर्वाद आणि आमची या मार्गातील पुण्याई म्हणजे आमच्या श्रीमती आईची आई म्हणजेच आमची आजी, हा आध्यात्मिक क्षेत्रातील आमच्या जीवनातील उष:काल.
नांदूरा नगरीत श्रींच्या प्रगटदिन उत्सवाचे श्री गजानन महाराजांच्या आगमनाचे सप्ताह सेवेचे प्रथम वर्ष.
आम्हा उभयताचा शिक्षकी पेशा असल्याने शालेय विद्यार्थी, शिकवणीचे विद्यार्थी हाच आमचा गोतावळा, त्यांच्या निरागस भावातून, त्यांचे सहकार्याचे हात हेच आमचे सेवाउत्सवाचे भांडवल. निसर्गानयमानुसार काळ पुढे सरकत गेला आणि इ.स. 2000 पर्यंत भाड्याच्याच घरा-घरातून आहे त्या परिस्थितीत समाधानानं श्रींचा प्रगट-दिनउत्सव सातत्याने संपन्न होत गेला. इ.स. 2000 मध्ये श्रींनी आम्हा सर्वांना स्वतःच्या छोटयाशा वास्तूत त्यांच्याच कृपाशिर्वादाच्या हातांनी नेलं.
200४ हे वर्ष कोवळ्या किरणांच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या प्रकाशानं न्हाहून निघाले. सांसारिक जीवनाच्या विकसित अवस्थेत दोन्ही कन्या त्यांच्या शिक्षणाच्या आवाक्यात मग्न असतांना हळूहळू वर्षे सरकत जाऊन जेष्ठ कन्या अस्मितास कन्या रत्न प्राप्त झाल, वेदिका हे नाम धारण करून ती या वेदीवर रांगू-बागडू लागली. तिचा जन्म आणि श्रींच्या प्रगटदिन सप्ताह संग श्रींचा पलंग – श्रींची गादी आणि श्रींच्या सेवेचा नित्य दिनक्रम सुरु झाला. श्रींच्या 'गुरु प्रासादाचे' रूपांतर श्रींच्या विश्रांती स्थानात झाले.
संगत सोबत असणाऱ्यांचे सद्भक्तांचे हात पुढे सरसावल्याने विश्रांतीस्थान, विकसित होऊ लागलं. आम्ही उभयता, विशेषत: सौ. संध्या हिने श्रींच्या प्रती असलेली दृढश्रद्धा प्रतित करण्यासाठी उत्तम सात्विक आहार श्रीना समर्पित करणे तिची समर्पित वृत्ती, दोन्ही कन्यांचा स्वतःचा संसार सांभाळून, स्वतःच्या जबाबदाच्या यशस्वीपणे हाताळत त्यांची श्रीच्या चरणी असलेली दृढ श्रद्धा, समर्पण भावना कृतीत व्यक्त करून सेवाभाव वृद्धींगत करीत आहेत.
२००४ ते २००९ या काळात कालक्रमानुसार दरवर्षी होणाऱ्या श्रींच्या प्रगटदिनाचा सप्ताह उत्सव सर्वांच्या सोत्साहाने श्रींच्या कृपाशीर्वादाने संपन्न होऊ लागला. इ.स. २०१० मध्ये श्रींच्या विश्रांती स्थानी एका नव्या सेवेचं आगमन झालं, ते असे की, जळगाव जामोद येथील एका गजानन भक्त प्राध्यापकांच्या सहकार्याने मुखोद्गत पारायण कार्याचा फोन द्वारे परिचय होवून एक दिवसीय संपूर्ण 2१ अध्यायांच्या ग्रंथाचे व्यासपीठासीन मु.पा.कर्ते डॉ. श्री गजानन खासनिस यांच्या सह सामु. पारायणाची संकल्पना श्रींच्या विश्रांती स्थानी प्रत्यक्षात सुरु झाली. तोवर विदर्भात तरी एकदम ३६६९ ओव्यांचा संतकवी श्री दासगणू विरचित श्री गजानन विजयग्रंथ तोंडपाठ असू शकतो याबाबत आम्ही सर्व यासंदर्भात अज्ञ होतो. डॉ. गजानन खासनिस, पुणे येथून २०१० या वर्षी नांदुरा येथे श्रींच्या विश्रांती स्थानी आलेत आणि त्यांच्या मुखोद्गत पारायणाची (जे की भक्त पोथी पाठ असू शकते याबाबत साशंक होते ) मालिकाच संपन्न होत गेली. तेव्हापासून आजतागायत (इ.स. २0२४ उजाडत आहे) डॉ. श्री. गजानन खासनिसांची सेवा आविरत आहे.
२००९ ते २०१० आम्हा उभयतांची कनिष्ठ कन्या रश्मी ही महा .राज्य. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून महा.पोलीस खात्यात पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाली आणि तिच्यासह आम्ही फिरते झालो आणि श्रीची सेवाही, श्रीच्या इच्छेनुसार श्रींच्या नियोजनानुसार सर्वच फिरते झालो. २००९ ते २०१० या वर्षात एक उत्तम उपलब्धी झाली ती म्हणजे श्रेष्ठ गजानन भक्त अकोला निवासी श्री सुनील देशपांडे हे श्रींच्या विश्रांती स्थानाशी एक अनन्य साधारण सेवाभाव म्हणून जोडल्या गेले ते आतागायत सेवामय आहेत .नांदुरा २०१० ला कायमस्वरूपी सोडले आणि मग अकोला-अकोट- अमरावती अशी सेवेची गांवे करत २०१४-२०१५ मध्ये अमरावती वासी झालो श्रींच्या आज्ञेनुसार अमरावती येथे स्थायिक झालो ( ज्येष्ठ कन्या अस्मिता ही अमरावतीकर झाल्याने, तिचे सासर येथील असल्याने तिच्याच आधाराने एक अनन्य आम्हीही अमरावतीकर झालोत.)
२०१५ - २०१६ हे वर्ष नविन परिवर्तनाचं ठरलं. या काळात बरीच स्थित्यंतरे अनुभवली आणि श्रींच्या कृपाशीर्वादाने सेवा मात्र अखंडीतच राहीली श्रीच्या विश्रांती स्थानाचे रुपांतर 'आनंदघन निवासी श्रींचे विश्रांतीस्थान, राजहिल नगर अमरावती' असे झाले 'न भूतो' पण भविष्यात मात्र अनेक वळणं घेत, श्रीनी त्यांच्या 'सेवेसाठी आम्हास भक्तीमय, निष्ठामय अशा प्रेममय बंधनात सुखासिन बंदीस्त केले. आणि निवृत्तीनंतर काय ? कसे? हे प्रश्नच उद्भवले नाही. आनंदघन निवासी श्रींच्या विश्रांती स्थानाने आकाशात वर वर जाणाऱ्या माध्यान्ही तळपणाऱ्या सूर्याचे तेजही अनुभवले.
२०१७ हे वर्ष सामु-पारायणांना प्रकाश -झोतात आणणारं वर्ष ठरलं. अमरावतीकरांसाठी ही नवसंकल्पना ठरली पारायणं, श्री गजानन विजय ग्रंथाची पारायणं आणि मुखोद्गत पारायण ही असु शकतात हे अमरावती येथील श्री गजानन भक्तांना नव्याने अनुभवावयास मिळाली. आनंदघन श्रींचे विश्रांतीस्थान हे प्रथमपासूनच प्रसिद्धीपराङ्मुख राहिलेले आहे पण 20१७ मध्ये जी ०९ पारायणं झालीत. ती सर्व मुखोद्गत - कर्त्याची झाली. त्यांचेसह इतरही भक्तांनी सामु. स्वरुपात सर्वाचा उत्साह पारायणाचा सुखद अनुभव घेतला पण या भव्य सोहळ्यात सर्वांचा अतिउत्साह आमचा नियोजनाचा अभाव आणि अनेकांचा हस्तक्षेप यामुळे प्रसिद्धीच्या झोतातच हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचा अधिकतम केंद्रबिंदू ठरला तो असा की आजूबाजूचे अनेक धार्मिक प्रवृत्तीचे, गजानन भक्त श्रींच्या विश्रांती स्थानाशी जोडल्या गेले म्हणता म्हणता श्रींच्या विश्रांतीस्थानात अनेकविध धार्मिक कार्य रुजू झाले.
२०१८ हे वर्ष सौ. अस्मितासाठी 'श्रींचा कृपाप्रसाद' म्हणून श्रींच्या विश्रांती स्थानाने एक नवीन पर्व सुरु केले. व्यासपीठ वाचक म्हणून दरमहा सामु. पारायणास सुरुवात झाली. महिन्यातून एक तर कधीकधी भक्तांच्या सेवाभाव इच्छेनुसार दोन दोन पारायण होवू लागली. सौ अस्मिताची ही पारायण सेवा सत् अनुकरण म्हणून अमरावतीत अनेक मंदिरात अनेक गृही पारायण पर्वास प्रारंभ झाला. २०१५ पासून वर्षात मुखोद्गत पारायणांची क्रमसंख्या वाढू लागली. २०१५ ते २०१९ या काळात श्रींच्या विश्रांतीस्थानी श्रींच्या एकादशी उपासनेला प्रारंभ झाला. श्रींच्या प्रगट दिन सप्ताह उत्सवात. श्रींच्या आदेशानुसार सज्जनगड निवासी श्री समर्थ रामदासांच्या 'दासनवमी' चा दासबोध वाचनाचा सप्ताह सोहळा सुरु झाला ०७,०९, ११,२१, 3१ / ' सामु. पारायणांची मालिका अखंडित सेवा म्हणून संपन्न होत आहे. त्याचसह निरासक्त संतश्रेष्ठ सद्गुरु प्रल्हाद महाराज, साखरखेर्डा यांची ही दरमहा उपासना श्रीच्या निवासस्थानी सुरु झाली (आम्ही उभयता श्री प्रल्हाद महाराजांचे अनुग्रहित आहोत. इ.स.२०१९ ते २०२१ या काळात भारतभर कोराना आ वासून (भयानक संकटाचीच चाहूल ) त्रस्त करू लागला. या काळात ' लॉक डाऊन' आम जनतेसाठी एक भयानक संकट निर्माण झाले. सारा महाराष्ट्र निराशेच्या खाईत गेला पण श्रींच्या विश्रांती स्थानी श्रींची सेवा अबाधित राहीली. सर्व मंदिरं बंद झालीत पण निवासी गृही आनंदघन रुपी श्रींचे वास्तव्य सर्वांना दिलासा देणारे ठरले 'लॉकडाऊन'
च्या त्रस्त जीवनात' अनलॉक' चा सुखद धक्का अनेकांनी अनुभवला शेगावनिवासी श्री गजानन महाराज 'संस्थान 'रुपाने जे चिरंतन आहेत ( ज्या संस्थानाचा स्वच्छतेचा, शिस्तीचा, पारदर्शकतेचा एक श्रेष्ठ आदर्श अनुकरणीय आहे तोच आदर्श नजरेसमोर ठेवून आनंदघन निवासी श्रींचे विश्रांती स्थान राजहिलनगर अमरावती येथे परिवर्तनशील कार्यात मग्न आहे. सर्वांच्या हितासाठी भक्तांच्या सेवेसाठी जे जे करण्या सारखे आयाम आहेत तेच स्विकारण्याचा अथक प्रयत्नश्री चे विश्रांती स्थान चालू ठेवणार आहेत पण प्रसिद्धीच्या झोतात येवून 'अहं'ची बाधा कोणासही होणार नाही याबाबत आनंदघन संस्था दक्ष राहण्याचा विनम्र सेवा भाव सतत जागृत ठेवणार आहे.
२०२१-२०२२ हे वर्ष परिवर्तनाची नांदी ठरलेलं आहे आनंदघन श्रींच्या विश्रांती स्थानाने एक नवी जबाबदारी ७५ ते १00 उपासकांच्या, निष्ठेनी कार्यकरणाऱ्या अजोड, अतूट बंधनात बांधल्या गेलेल्या सद्भक्तांच्या एकजुटीन स्विकारलेली आहे ती जबाबदारी एक नवे आव्हान आहे श्रींच्या सेवाभावाचे ते एक श्रेष्ठ ब्रीद आहे याची गहन जाणिव सर्वांच्या अंत:करणात एकवटली आहे आणि त्या कार्यसिद्धी साठी नवा उत्साह सद्गुरूंनी प्रेरित केला आहे आणि म्हणूनच आनंदघन निवासी श्रींच्या विश्रांती, स्थानंतर्गत 'आनंदघन आध्यात्मिक बहुसेवा भावी संस्था पंजीकृत करण्यात आली आहे. या संस्थेने 2020 ते 2022 काळात सामा. सेवेच्या उपक्रमांतर्गत आरोग्यशिबिर घेतली आहेत सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर दाम्पत्य श्री सौ निलेश इंगळे आयुर्वेद तज्ञ यांच्या सहकार्याने अनेक कॅम्पस घेतले आहेत. सामु.पारायण सेवेचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून एकाच दिवशी एकाच वेळी अमरावती शहरात २५ आयोजकांच्या औदार्यवृत्तीने २५ ठिकाणी एक दिवसीय पारायण सोहळा श्रींच्या आदेशाने, त्यांच्याच कृपेने घेतला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात, गरीब वस्तीत, अहोरात्र काबाडकष्टी पर्यंत अन्नपदार्थ पॅकेट च्या स्वरूपात जबाबदारीने पोहचविण्याचे कार्य केले आहे याबाबत सर्व सदभक्तांच्या 'माई' विश्रांतीस्थानाची अविरत मेहनत करणारी सेवाव्रती माऊलीचा मोलाचा वाटा आहे.
2022 नोव्हें १,२,३ हे त्रिदिवसीय राज्यस्तरीय ०५वे श्री गजाननाच्या भक्तांचे संमेलन आनंदघन आध्या. बहुसेवाभावी
संस्थेव्दारा (र. नं. F29562) संपन्न झालेले संस्मरणीय सेवाकार्य ठरले श्रींची प्रेरणा, श्रींचा आशिर्वाद, श्रींचा प्रेममय आदेश या त्रिसुत्रीने घडून आलेल्या या संमेलन यशस्वीतेचे श्रेय सातत्याने ०६ महिने आवरत परिश्रम घेणाऱ्या सर्वच उपासकांना त्यांच्या जीवाचे रान करणाऱ्या परिश्रमांना जाते एक लाख अपेक्षिलेल्या योगदानचं स्वरूप २५ लाखापर्यंत जावं याचे न उकलणारे गूढ एकट्या श्रीगजाननालाच ठावे. या संमेलनाच्या निमित्यान आलेले कटू - गोड अनुभव श्रींच्या चरणी समर्पित.
या पंजीबद्ध झालेल्या संस्थेची कार्यकारिणी येणेप्रमाणे आहे.
अध्यक्षा - सौ. अस्मिता केवले,
उपाध्यक्षा सौ. संध्या नांदेडकर,
सचिव - अस्मादिक (लेखनकर्ते),
सहसचिव श्री विवेक गावंडे,
कोषाध्यक्ष- श्री विलास पांडे,
सहकोषाध्यक्ष - श्री अंबादास बनारसे,
कार्यकारिणी सदस्य :- श्री अरुण डाफ, सौ. सुचेता डाफ, श्री रघुवीर सुतवणे, श्री दत्ताभाऊ गर्गे, श्रीमती शोभा जावरकर, सौ. शिल्पा भातकुले,सौ. वंदना मालधुरे, श्री अनिल घडयाळजी, श्री रमेश धर्माधिकारी
-
श्रीच्या विश्रांती स्थानी 2023 मध्ये 02 नवे उपक्रम प्राधान्याने सुरु झालेले आहेत. यात आनंदघन विचारधारा म्हणजे नियमित सेवाधाऱ्या नी ( प्रत्येक दोन ) ०३ ते ०५ मि.साठी आध्या. विषयावर आपले विचार मांडावयाचे. या विचारांची नेमकी टिप्पणी किंवा मुद्देसुद नेमक्या विचारांचे संकलन लेखी स्वरूपात करण्याचे कार्य सौ. संध्याताई गावंडे यांचे कडे आहे.त्या विचार संकलक आहेत. दुसरा उपक्रम म्हणजे प्रत्येक एकादशीस श्रीहरीपाठ सामु- स्वरुपात घेण्यात येतो. तसेच आनंदघन निवासी श्रींच्या आध्या.बहु-सेवा संस्थे व्दारा 2021 ते 2023 या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह तसेच श्री गुरुचरित्र सामु. पठण श्री दत्त जयंती निमित्त सातत्याने याही सेवा सुरु आहेत.
२०२४ चा नव्या उमेदीने, सर्वांना सेवेसाठी सज्ज करणारा, नवी ऊर्जा देणारा सूर्योदय तुम्हा-आम्हास, श्रींच्या अनन्यसेवा धारकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. श्रींच्या विश्रांती स्थानाचे सदैव असणारे ब्रीद म्हणजे 'निरपेक्ष सेवाभाव' आणि निरपेक्ष बुद्धीने सेवाकार्य, हेच ब्रीद पूढे घोषवाक्याने सुदृढ बनणार आहे. "अहंची बाधा न दृष्टी लागो आम्हा. दृष्टी आमुची सदैव पाहो गुरुराया तुम्हा"।
जाने. २०२४ ची पहाट एका नव्या उन्मेषाने उद्यास येत आहे, संस्थेने श्रींच्या प्रेमळ आदेशानुसार, प्रेरणेनुसार निश्चित केलेला सेवा कार्यक्रम येणे प्रमाणे -
शनि. दि. ०६.०१.२४ श्रींच्या विश्रांती स्थानापासून श्री चिंतामणी लॉन पर्यंत सकाळी ७.०० वा. ग्रंथदिंडी सौ विद्याताई पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत. सकाळी ८ वा. मुखोद्गत पारायणास सर्व सद्भक्तासह प्रारंभ (मु.पा. कर्त्या सौ. विद्याताई पडवळ) ठाणे सायं. ५-३० वा. बालमेळाव्यास प्रारंभ (वयोगट ०६ते १६) विशेष कौशल्य संपादन प्राप्त विशेष अतिथीच्या प्रमुख बाल / किशोरांच्या उपस्थितीत (विदर्भस्तरीय) प्रथम सामु. हनुमान चालिसा पठण सर्व बालचमू/ किशोर वर्ग वि.कौ संपादन प्राप्त प्राविण्य संपादक :
(१) चि मृगांक वि. जोशी (बासरी वादन )
(२) चि.कु. श्रुती भांडे (गायन)
(३) चि.कु· सुरभी सु.भा.ढगे ( मुखो, पारायण कर्ती )
रवि. दि. ०७.०१.२४ सकाळी ८ वा. श्री विद्याधर जोशी मु.पो. कर्ते पुणे यांच्यासह सामु. पारायण सायं ०५वा: श्रीगजानन देशपांडे, नागपूर (संपूर्ण विदर्भात सामु. पारायणाचे संकल्पक) यांचे विचार प्रगटन. त्यानंतर श्री|सौ उभयता पालक मेळावा
सोम. दि. ०८.०१. २४ सकाळी ०८ वा. ०३ रे सामुहिक पारायण डॉ. श्री. गजानन खासनिस मु.पा. कर्ते, पूणे सायं. ५वा : डॉ. जयंत वेलणकर, नागपूर ( एकादशी उपासनेचे उद्गाते आणि श्री गजानन अनुभव ०३ आवृत्यांचे . शब्दांकन कर्ते ) यांचे मनोगत. त्यानंतर जेष्ठ मान्यवरांचा मेळावा (वयोगट ५५ ते १०० आणि आनंदधन आध्या. बहु. सेवा. संस्थेच्या अंतर्गत वय वर्ष ७५ पूर्तीचा अमृतमय सत्कार.
मंगळ दि. ०९.०५.२४ विदर्भस्तरीय तरुणाई मेळावा (वयोगट १७ ते ३५)
व्यासपीठासीन तज्ञ मार्गदर्शक आणि तरुण/तरुणी
वेळ साय. ५वा. प्रश्नोत्तरी चर्चा ( तरुण/ तरुणींनी १० प्रश्र्नांची प्रश्नावली तयार करणे )
बुध. दि १०.०१.२४ विदर्भस्तरीय त्रिपदी परिवार सत्संग
प.पू श्री नानामहाराज तराणेकर, इंदौर- आणि प.पू. श्री आगाशे काका, त्रिपदी परिवार सत्संग आणि त्रिपदी गायन.
तसेच श्री गजानन भक्त श्री सुनिल देशपांडे आणि गजानन भक्त श्रोता यांचेत सुसंवाद
उपस्थित जनसमुदाय यांचेत सांगता समारोप सुसंवाद.
या संपूर्ण गजानन सेवा सोहळ्याचे वैशिष्ट्य: संपूर्ण कार्यक्रमाचा सेवालाभ घेण्यासाठी प्रतिदिन – प्रतिव्यक्ती रु.१००/- रोख सहयोग राशी व्यवस्थामूल्य भरून- पोचपावती घेऊन प्रवेशपत्र घ्यावे.
प्रवेशापत्राशिवाय कोणासही सेवा कार्यस्थळी प्रवेश नाही कार्यकारिणीसह सर्वच प्रवेशइच्छूक सद्भक्तांनी प्रवेशपत्र घेऊनच सभागृहात / सभामंडपात प्रवेश घ्यावा ही विनंती पुढील महत्वपूर्ण नोंदी करून सध्याचा हा लेखन प्रवास थांबवतो. (It is only taking pause not to end.)